लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वन क्षेत्राचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेवून यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यात १० जुलै रोजी गुरु पौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय कार्यालयांचा परिसर, रस्त्याच्या दुतर्फा आणि शाळा, ग्रामपंचायत स्तरावर वृक्ष लागवड करण्यात आली. लातूर तालुक्यातील अंकोली येथे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या उपस्थितीत ५ हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाला सुरुवात झाली.
उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, वन परिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, वन परिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, वनरक्षक बालाजी पाटील, महेश पवार, गोविंद घुले, सरपंच समाधान आडगळे, उपसरपंच सुधाकर गवळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त १० जुलै रोजी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होवून आपल्या घराच्या परिसरात, गावात वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमकरकर यांनी केले होते. जिल्ह्यातील शाळा, आरोग्य संस्था, तलाव, सिंचन प्रकल्प आदी परिसरात वृक्ष लागवड करण्यावर विशेष भर द्यावा. वृक्ष लागवडीत लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण भागात, तसेच शेतक-यांच्या बांधावर वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत व्यापक स्वरुपात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली.

