बुलडाणा : प्रतिनिधी
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ कंपनी ही प्रसिद्ध ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे उत्पादन करते. अशातच या कंपनीला गॅसच्या तीव्र टंचाईला सामोरो जावे लागले आहे. त्यामुळे गेल्या गुरुवारपासून ही कंपनी बंद पडली आहे. परिणामी, कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, शिवांगी बेकर्समध्ये प्रामुख्याने ‘क्रीम’ आणि ‘ग्लुकोज’ बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. येथील बिस्किट बनवण्याचे बेकिंग ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालतात. मात्र युद्धाच्या संकटामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत, परिणामी कंपनीला आवश्यक असलेला गॅस पुरवठा खंडित झाला असून, ग्लुकोज ओव्हनसह संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली आहे. या कंपनीत सुमारे ५०० कामगार कार्यरत आहेत. उत्पादन बंद राहिल्याने या कामगारांच्या कुटुंबासमोर आर्थिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपनी लवकर सुरू झाली नाही तर कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यात घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अशातच नित्य नियमाने जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथील ९०० पुरुष, ६०० महिला असे जवळपास अंदाजे पंधराशे पायदळ वारकरी चार दिवसांचा १०५ किलोमीटरचा प्रवास करत गॅसच्या तुटवड्यावर मात करत शेगावात दाखल झाले आहेत. रस्त्याने चालताना लाकूड फाटा जमा करत वारक-यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईवर मात करत दररोज म्हणजे पाच दिवस पंधराशे वारक-यांचा दोन्ही वेळ स्वयंपाक चुलीवर केला. गॅस टंचाईवर मात करत लाकडाचे इंधन वापरत शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनाला पोहोचले. सध्या युद्ध परिस्थिती असल्याने सर्वत्र गॅस तुटवडा जाणवत आहे, पायदळ वारीसोबत गॅस सिलिंडर होते, मात्र ते संपले होते, अशातच सोबत असलेल्या लाकडी इंधनावर स्वयंपाक केला, त्यामुळे अडचण आली नाही. अशी प्रतिक्रिया दिंडी चालकांनी दिली.
मंगल कार्यालयात चुलीवरचे जेवण
सांगलीत हॉटेल चालकाबरोबरच मंगल कार्यालय चालकांना देखील गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने मंगल कार्यालयात आता चुलीवर स्वयंपाक केला जातोय. लग्नामधील जेवणाचे आहे तेच मेन्यू चुलीवर बनवून लग्न सोहळे उरकले जातायत. जवळपास हजार ते बाराशे लोकांचे देखील जेवण चुलीवर केले जात आहे.

