२ महिलांचा मृत्यू, तातडीने बचावकार्य
बीड/जालना : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील गोळेगाव येथून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे जाणारी सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याने २ महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य राबविण्यात आले. गोळेगाव आणि पुरुषोत्तम पुरी या २ गावांदरम्यान गोदावरी नदी ओलांडण्यासाठी बोटीचा वापर केला जातो. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविल्याने नदीच्या मध्यभागी पोहोचताच बोटीचा तोल गेला आणि ती पाण्यात बुडाली.
बोट बुडताच एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीव वाचविण्यासाठी पोहण्याचा प्रयत्न केला. त्यातच घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनी नदीत उतरून अनेक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळीच जखमींवर प्राथमिक उपचार केले तर काही गंभीर जखमींना रुग्णालयात हलविले.
या दुर्घटनेत २ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथील कुंबेफळ गावच्या रहिवासी कांता ज्ञानदेव आंधळे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव जालनाच्या आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तर बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावच्या प्रमिला शेषराव राठोड यांचाही मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
संबंधितांवर केली
कारवाईची मागणी
दरम्यान, वाळू उपसा करणा-या बोटीमधून प्रवासी वाहतूक कशी करण्यात आली, तसेच बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी का बसविण्यात आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
















