लातूर : प्रतिनिधी
गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ मंगळवारपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुरु आहे. शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर गौरी पुजन होते. फुलांच्या मागणीच्या तूलनेत आवक कमी होता त्यात पुन्हा महागाई. त्यामुळे लातूरच्या फुल बाजारात फुलांचे भाव वधारले होते. ऐरवी २० रुपये किलोने मिळणा-या झेंडूच्या फुलांचा छोटाचा हार १५० रुपयांचा विकला गेला. शुक्रवारी फुलांचे दर गगणाला भिडले होते.
गणेशोत्सव सुरु झाल्यापासून लातूरच्या बाजारपेठेत दर दिवशी जवळपास तीन-चार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. सध्या गणेशोत्सव आणि मंगळवारपासून घरोघरी गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे शुक्रवारीबाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांची आवक घटल्यामुळे भाव दुपटीने वाढले आहेत. १५० रुपये ते ३५० रुपये किलो दराने फुलांची विक्री केली गेली. १०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत रेडीमेड हार विक्रीसाठी उपलब्ध होते. शुक्रवारी सायंकाळी सुभाष चौक, दयानंद गेट, पाचनंबर चौक, पु. अहिल्यादेवी होळकर चौक, जुना रेणापूर नाका, औसा रोडवरील नंदी स्टॉप, राजीव गांधी चौक आदी ठिकाणी फुलांच्या हारांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
लातूरच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचे हार १०० ते १५० रुपये, पांढ-या शेवंतीचा हार ४०० ते ६०० रुपये, पिवळ्या शेवंतीचा हार ३०० ते ४०० रुपये, काकडा १२०० रुपये किलो, व्हेलवेटचा हार ५०० रुपये, गुलाब पुष्प ४०० ते ५०० रुपये शेकडा तर कमळाचे एक फुल २० ते ५० रुपयांपर्यंत विकले गेले. खरे तर दुष्काळामुळे मागणीच्या तूलनेत फुलांची आवक खूप कमी झाली. त्यात महागाईने डोकेवर काढल्याने फुलांच्या ठोक बाजारातच फुलांना सोन्याचा भाव होता. त्यामुळे फुलांची किरकोळ विक्रीचा भाव दुप्पटीने वाढल्याचे येथील फुल विक्रेते संतोष फुलांरी यांनी सांगीतले.
















