औसा : प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय पाणीपुरवठा योजनांसाठी शेती पंपाच्या धर्तीवर स्वतंत्र सौर पंप योजना सुरू करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करीत निवेदन दिले.
राज्यात राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन योजना तसेच इतर योजनांद्वारे बहुतांश गावांमध्ये कायमस्वरूपी शासकीय पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अनेक गावांमध्ये सार्वजनिक विंधन विहिरी आणि पाणीपुरवठा विहिरींच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो मात्र या योजनांच्या विद्युत पुरवठ्यासंदर्भात अनेक गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे आ. पवार यांनी मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.सध्या बहुतांश गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध नसल्याने शेतीपंपाच्या रोहित्रावरच पाणीपुरवठा योजनांचा भार टाकला जातो. त्यामुळे रोहित्रावर अतिरिक्त ताण येऊन ते वारंवार नादुरुस्त होणे, जळणे किंवा कमी दाबाने वीजपुरवठा होणे अशा समस्या उद्भवत आहेत. परिणामी पाणीपुरवठा योजनांचे विद्युत पंप सुरळीत चालत नसल्याने अनेक गावांमध्ये पाणी असूनही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय पाणीपुरवठा योजनांची वीज देयके थकीत राहिल्यामुळे महावितरणकडून अनेकदा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे गावातील नागरिकांना, विशेषत: महिलांना, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर किंवा दूरच्या स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागातील ही गंभीर समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र सौर पंप योजना सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे आ. पवार यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत सौर उर्जेवर आधारित स्वतंत्र पंप प्रणाली कार्यान्वित केल्यास दिवसभर अखंडित वीज उपलब्ध राहून पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवता येतील. तसेच विजेवरील अवलंबित्व कमी होऊन वीजबिलाचा आर्थिक भारही कमी होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात शेतक-यांसाठी महावितरणमार्फत राबविण्यात येणा-या मागेल त्याला सौर पंप’ योजनेच्या धर्तीवर गावांच्या शासकीय पाणीपुरवठा योजनांसाठीही स्वतंत्र सौर पंप योजना राबविण्याची मागणी केली आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागास आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आ. पवार यांनी दिली.‘ग्रामीण भागातील नागरिकांना, विशेषत: महिलांना, पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास कमी करून गावांना शाश्वत आणि अखंडित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हा या मागणीमागील मुख्य उद्देश आहे, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. दरम्यान, या मागणीमुळे राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, सौर उर्जेच्या माध्यमातून शाश्वत आणि सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
















