शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध असूनही त्या प्रत्यक्षात रुग्णांच्या उपयोगात येत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेली एक्सरे मशिन अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. तांत्रिक कर्मचारी व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही सुविधा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व हाडांच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना खासगी दवाखाने किंवा लातूर, उदगीर येथे जावे लागत आहे. तसेच रुग्णालयातील लॅब सेवाही अपु-या कर्मचा-यांमुळे विस्कळीत झाली आहे. रक्त तपासणी व इतर वैद्यकीय चाचण्या वेळेवर होत नसल्याने रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना खासगी लॅबचा खर्च परवडत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तांत्रिक कर्मचारी यांची अनेक पदे रिक्त असल्याचेही समोर आले आहे. परिणामी उपलब्ध कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. अनेकदा रुग्णांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाने तातडीने रिक्त पदे भरावीत, बंद पडलेली एक्सरे सेवा सुरू करावी तसेच लॅब विभाग सक्षम करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत एका नागरिकाने संताप व्यक्त करताना सांगितले की, रुग्णालयात सुविधा आहेत पण त्या वापरात नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधा तातडीने सुरळीत न झाल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
















