जळकोट : प्रतिनिधी
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) मंडळ अधिकारी यांना शासकीय कामकाजासाठी लॅपटॉप तसेच स्कॅनर-प्रिंटर उपलब्ध करून देण्याची मागणी शासन स्तरावर दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. मात्र या मागणीची दखल शासनाकडून घेतली जात नसल्याने महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी १५ डिसेंबरपासून जळकोट तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यभरातील तलाठी व मंडळ अधिकारी आपापल्या तहसील कार्यालयात डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जमा केले आहे. सर्व प्रकारचे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची भूमिका संघटनेकडून सर्वानुमते घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. जळकोट तालुक्यातील १०० टक्के ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या डीएससी तहसीलदारांकडे जमा केलेल्या आहेत. तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. आंदोलनाच्या काळात सर्व संबंधित अधिकारी आपापल्या सज्जामध्ये उपस्थित राहणार असून कोणतेही ऑनलाईन काम होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
जळकोट येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी हंसराज जाधव, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद सूर्यवंशी, अतिक शेख, आकाश पवार, परशुराम जानतीने, महादेव पाटील, नागेश हरणे, कुंदन लोखंडे, लक्ष्मण अटकळे, बाळराजे बरगे, प्रसाद पाटील, बाळू बोईनवाड, भावना भेंडेकर आदी उपस्थित होते.
















