निलंगा : प्रतिनिधी
तब्बल २४ महिन्यांचे मानधन थकीत असतानाही वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने निलंगा तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक अखेर आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ महासंघाच्या वतीने तहसीलदार तथा गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन गुरुवार दि. ८ ऑक्टोबरपासून अनिश्चीत काळासाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून, शासन निर्णयानुसार थकीत मानधनाची तातडीने पूर्तता करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. दरमहा ८ हजार रुपये मानधन आणि २ हजार रुपये प्रवास भत्ता नियमितपणे देण्यात यावा तसेच मानधन थेट बँक खात्यात वेळेत जमा करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय ग्राम रोजगार सहाय्यकांना कायमस्वरूपी सेवा संरक्षण व सुरक्षा कवच देण्यात यावे, ग्रामसभेच्या ठरावावरून सेवा समाप्त करण्याची पद्धत बंद करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. अनेकदा निवेदने आणि पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर काम बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
ग्राम रोजगार सहाय्यक हे ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यामुळे त्यांच्या कामबंद आंदोलनाचा फटका मनरेगाच्या कामांची नोंदणी, मजुरांची उपस्थिती, कामांची प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित ऑनलाइन कामकाजाला बसण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील रोजगाराची गरज वाढली असतानाच हे आंदोलन सुरू झाल्याने प्रशासनासमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे २४ महिन्यांच्या थकीत मानधनाचा गुंता प्रशासन कधी सोडवते आणि मनरेगाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी कोणता निर्णय घेते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय सोळुंके, माजी पं. स. सभापती अजित माने, संघटनेचे अध्यक्ष कमलाकर वाघे, खंडू गायकवाड, तालुका सचिव बालाजी मोरे, संघटक श्रीधर लोभे, प्रसिद्धीप्रमुख काशीनाथ कळशे, सिद्धनाथ माने यांच्यासह ग्राम रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
















