मुंबई : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील अशोक नगर, चिराग नगर भागातील गौसिया चाळीवर मध्यरात्री ३ ते ४ घरांवर अचानक दरड कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. आज (दि. १२) पहाटे घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन जण ढिगा-याखाली अडकलेले आहेत.
अशोक नगर हा डोंगराळ झोपडपट्टीचा भाग आहे. आज पहाटे या ठिकाणी असलेल्या गौसिया चाळीवर एक मोठे पिंपळाचे झाड आणि मोठी दरड खाली चाळीवर कोसळली. पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान गाढ झोपेत ही कुटुंबे असताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला. एकीकडे प्रचंड पाऊस, काळोख आणि अरुंद गल्लीबोळांचा रस्ता यांमुळे अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांना बचावकार्य कठीण झाले होते. मात्र पहाट होताना पावसाने उसंत घेतली. यानंतर बचावकार्य जोमाने सुरू झाले. सुरुवातीला दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन तरुण अजूनही ढिगा-याखाली अडकले असल्याने बचावकार्य सुरूच आहे.
अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी
या बचावकार्यादरम्यान दुर्घटनाग्रस्त भागात काम करताना अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनवणे (वय ३०) आणि शिवम द्विवेदी (वय २९) हे जखमी झाले. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही रुग्णालयातून सुखरूप घरी सोडले आहे.सध्या परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बचावकार्य सुरु आहे.
बाधित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविणार
महापालिका अधिकारी गजानन जैतापकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वीही, पावसाळ्याआधी अनेक घरांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. बचावकार्य सुरू आहे. आम्ही पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेत आहोत. बाधित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाण्याची शक्यता आहे.
बचावकार्य सूरु
या नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले की, “पावसामुळे घाटकोपर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. बचावकार्य सुरू आहे. येथे पोलिस कर्मचारी तसेच बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व पथके तैनात करण्यात आली आहेत.
















