लातूर : प्रतिनिधी
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावरील झालेला हल्ला हा प्राणघातक असून या घटनेचा मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे असल्यामुळे कलमात वाढ करावी आणि सुनील तटकरे यांना आरोपी करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे.
विजयकुमार घाडगे यांनी सुनील तटकरे यांना दिलेले निवेदन हे लोकशाही मार्गाने होते, असे असताना सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच आणि त्यांनी रचलेल्या कटाप्रमाणे प्रदेशाध्यक्षाचा अपमान झाल्याचा राग मनात धरून विजयकुमार घाडगे यांना जिवे मारावे याच मुख्य उद्देशाने सुरज चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी विश्रामगृहात फायटर, लोखंडी कडे याचा वापर करून, तसेच कोपराने घाडगे यांच्या मानेवर जबर मारहाण केली. त्यांच्या चेह-यावर आणि डोळ्यावर सुद्धा जबर मारहाण
केली.
मानेचा भाग हा शरीराचा नाजूक भाग असतो आणि त्यावरच केलेली मारहाण म्हणजे विजयकुमार घाडगे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होता म्हणून विवेकानंद पोलीस स्टेशन येथील दाखल केलेल्या गुनह्यातील कलमे अपुरी आहेत. म्हणून विजयकुमार घाडगे यांचा पुरवणी जवाब घेण्यात यावा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न कलम १०९ आणि कट रचने कलम ६१ वाढवण्यात यावे, तसेच सुनील तटकरे यांना आरोपी करावे, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे केली असता शिष्टमंडळाला निवेदनाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक यांनी अश्वस्त केले.
या शिष्टमंडळात प्रामुख्याने अॅड. उदय गवारे, नेहरू देशमुख, हंसराज जाधव, डी. एस. पाटील, अॅड. शेख जैनु, अॅड. चंद्रकांत मेटे, डॉ. अमित पाटील, नानासाहेब जाधव, अॅड. देविदास बोरुळे, अॅड. भालचंद्र पाटील, दत्ता टेकाळे, अॅड. योगेश शिंदे, अॅड. ए. व्ही. चव्हाण, सचिन दाणे, सतीश कारंडे, अॅड. हरी निटुरे, वैजनाथ जाधव आदी उपस्थित होते.

