लातूर : प्रतिनिधी
चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून चंदनाची लाकडे बाळगणा-याला पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एकास अटक. त्याच्याकडून २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात दि. २ जुलै रोजी विशेष पथका औसा पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी परिसरामधील हनुमाननगर येथील एका पत्राच्या शेडवर छापेमारी करण्यात आली. सदर शेडमध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व लाकडाची चोरटी विक्री करण्यासाठी साठवून चंदन बाळगलेला स्वप्नील संजीव माने वय २४ वर्षे रा. आळवाई ता. भालकी हा मिळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ७२ किलो चंदन तसेच चंदनाची लाकडे तोडण्यासाठी व तासण्यासाठी लागणारे साहित्य, तराजू असा एकूण २ लाख ८८ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विशेष पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, पोलीस अमलदार रामहरी भोसले, युसुफ शेख, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव, कुंभार यांनी केली आहे.