मुंबई : प्रतिनिधी
चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. मात्र पालघरमध्ये राज्य मासा संकटात सापडला असून चंदेरी पापलेटची प्रजाती धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. सरसकट व लहान आकाराच्या बेसुमार मासेमारीमुळे पापलेट माशाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने आता या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
चंदेरी पापलेट अर्थात सरंगा मासा हा जगप्रसिद्ध मासा असून महाराष्ट्रातील किनारी भागातून या माशाचे मोठे उत्पादन आहे. चंदेरी पापलेट म्हणजेच सिल्व्हर पॉम्फ्रेट हा पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर आढळतो. पापलेटच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र या सगळ्यात चंदेरी पापलेटला अधिक मागणी असते. खवय्यांकडूनही सर्वाधिक पसंती असते. त्याचबरोबर या माशाची परदेशातही निर्यात केली जाते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
लहान माशांची हानी
पापलेटची मासेमारी करताना काही विशिष्ट पद्धती वापरून ती करणे अपेक्षित असताना लहान माशांची अपरिमित मासेमारी केल्यामुळे पापलेटची वाढ होत नाही. परिणामी पापलेटची मासेमारी करताना मच्छिमारांच्या हाती निराशा येते. मासेमारीच्या पद्धतीत गेल्या काही वर्षांत बदल होत असल्यामुळे पापलेटचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. त्यात पर्ससीन, एलईडी, परराज्यातील मच्छिमारांची घुसखोरी अशा प्रकारांमुळेही माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
नुकसानीसह पापलेटचे प्रमाणही घटतेय
सध्या काही ठिकाणी १०० ग्रामच्या आत असलेल्या पापलेटची मासेमारी होत आहे. या आकाराचे पापलेट किलोमागे ५० नग भरत आहेत, यांचा दर एका टबला किंवा साधारण किलोमागे १२५० असा आहे. हाच दर तीन महिन्यांच्या या माशाच्या वाढीनंतर साडेबारा पट होतो. अर्थात लहान माशाच्या तुलनेत वाढ झालेले पापलेट लाखांचे उत्पन्न देतात. लहान आकाराच्या माशाच्या बेसुमार मासेमारीमुळे आर्थिक नुकसानीसह पापलेटचे प्रमाणही घटत चालले आहे.

