गुवाहाटी : वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या दरम्यान, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) गुवाहाटीच्या संशोधकांनी कोरोना चाचणीचा एक नवीन आणि स्वस्त मार्ग शोधला आहे. कोव्हिड-१९ रोगाचे कारण बनणा-या सार्स-सीओव्ही-२ चा शोध घेण्यासाठी त्यांनी चक्क मातीचा वापर केला आहे.
संशोधकांना असे आढळले आहे की, मातीचे कण ‘कोव्हिड’ला कारणीभूत होर्णाया ‘सार्स-कोव्ह-२’ या कोरोना विषाणूच्या उपस्थितीत वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. हा शोध एक सोपा, स्वस्त चाचणी पर्याय विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर्नल ‘अप्लाईड क्ले सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी सांगितले की, मातीचे कण विषाणू असलेल्या खारट-पाण्याच्या द्रावणात लवकर तळाशी बसतात. विषाणूच्या उपस्थितीमुळे मातीच्या इंटर पार्टिकल फोर्समध्ये बदल झाल्यामुळे, मातीच्या इलेक्ट्रोलाईट प्रणालीचा सेडिमेंटेशन दर बदलला. ‘सेडिमेंटेशन’ ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये द्रव किंवा वायूमध्ये विरघळलेले कण गुरुत्वाकर्षण किंवा इतर शक्तींमुळे द्रवामधून बाहेर पडतात. टीमने म्हटले आहे की, हे निष्कर्ष विषाणू शोधण्यासाठी सध्या वापरल्या जाणा-या जटिल, महागड्या पद्धतींच्या तुलनेत सोपे आणि स्वस्त पर्याय असू शकतात.
आयआयटी गुवाहाटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रोफेसर आणि प्रमुख लेखक टी.व्ही. भरत म्हणाले, ‘कोव्हिडच्या चाचणीसाठी वापरल्या जाणा-या पीसीआरसारख्या सध्याच्या पद्धती अत्यंत संवेदनशील आहेत; परंतु त्यास वेळ लागतो आणि उपकरणांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे, अँटिजेन चाचणी जलद आहे; परंतु अचूकता कमी आहे, तर अँटिबॉडी चाचणीचा उपयोग संसर्ग झाल्यानंतर केला जातो. संशोधकांनी या चाचणीसाठी ‘बेंटोनाईट माती’चा वापर केला, कारण तिची अद्वितीय रासायनिक रचना प्रदूषके आणि जड धातू सहजपणे शोषून घेण्यास मदत करते.