18.4 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeसोलापूरचर्चेत असणा-या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद

चर्चेत असणा-या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद

सोलापूर : सोलापुरातील अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. दरम्यान काल याच अनगरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. उज्ज्वला थिटे यांनी भाजपच्या राजन पाटील यांच्यावर आरोप करत पोलिस संरक्षणात अर्ज दाखल केला. मात्र अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी आक्षेप घेतल्यानंतर अर्ज बाद करण्यात आला.

अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. काल अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांनी नामनिर्देशनपत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यानंतर भाजपचे सर्व १७ उमेदवार बिनविरोध झाल्याचेही सचिन मुळीक म्हणाले.

दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचे उज्ज्वला थिटेंनी सांगितले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. आता अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले असून याठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ती प्रतिष्ठेची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची साथ सोडून राजन पाटील यांनी भाजपचे कमळ हातात घेतले होते. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणूक न लढवताच भाजपच्या पदरात पडेल,

असा अंदाज होता. मात्र, याठिकाणी अजित पवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या अनगरमधील एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. मात्र, मंगळवारी रात्री नाट्यमयरीत्या छाननीदरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिका-यांनी बाद ठरवला होता. यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR