28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeसंपादकीयचांदीची चांदी!

चांदीची चांदी!

जागतिक बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढल्याने मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंनी ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दराने प्रथमच दीड लाखाचा टप्पा ओलांडला असून चांदीने ३.२७ लाख प्रति किलोचा टप्पा गाठून सर्वांनाच चकित केले आहे. सोन्याचा भाव ६८६१ रुपयांच्या वाढीसह १,५२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ४७०० डॉलरच्या पार गेल्याने आणि रुपयाची सातत्याने होणारी घसरण यामुळे २०२६च्या सुरुवातीपासूनच सोन्यातही तेजी पहायला मिळत आहे.

चांदीच्या दरातही अभूतपूर्व वाढ झाली. चांदीचा भाव १७,७२३ रुपयांनी वधारून ३,२७,९९८ रुपये प्रति किलो या ‘ऑल टाईम हाय’ वर पोहोचला. गत दोन सत्रांत चांदीच्या दरात ३२ हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील संभाव्य ‘व्यापार युद्ध’, आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्याला दिलेली पसंती, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा परिणाम या दरवाढीवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरता येत नाही, तोपर्यंत ही अस्थिरता कायम राहील. या दरवाढीमुळे ज्यांनी कमी दरात सोने खरेदी केले आहे, त्यांना नफा कमावण्याची चांगली संधी आहे. लग्नसराईसाठी खरेदी करणा-यांना वाढीव किमतीचा फटका बसणार आहे. त्यामुळे सध्याच्या दरात गुंतवणूक करण्याऐवजी थोडी प्रतीक्षा करणे योग्य ठरू शकते. बाजार सध्या अत्यंत अस्थिर असल्याने घाईघाईत कोणताही निर्णय न घेता बाजाराच्या स्थिरतेची वाट पाहणे हिताचे ठरेल. सराफा व्यापा-यांच्या मते सध्या बाजारात तेजीचे वातावरण असल्याने सर्वसामान्यांनी आणि गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याची गरज आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मौल्यवान धातूंकडे धाव घेतल्याने दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गाठली.

चांदीच्या दरात एकाच दिवसात १७ हजार रुपये प्रति किलोची वाढ नोंदवण्यात आली. दोन दिवसांत चांदी ११ टक्क्यांनी महागली, ही तेजी थक्क करणारी आहे. सोमवारी चांदीने पहिल्यांदाच ३ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. केवळ दोन ट्रेडिंग सत्रामध्ये चांदीची किंमत ३२,१८७ रुपयांनी वाढली. म्हणजे केवळ दोन दिवसांत चांदी ११.१८ टक्क्यांनी महागली. ‘तूफान आलंय दर्याला’च्या चालीवर चांदीच्या दरातही तूफान आलं आहे. भू-राजकीय तणावाचा परिणाम चांदीच्या किमतीत अचानक वाढ होण्यावर झाला आहे. सोमवारी ट्रम्प यांनी ग्रीनलँड जोडण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचे संकेत दिल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदी आणि सोन्याची मागणी शिगेला पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाबींमधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘विघटनकारी’ धोरणांमुळे मौल्यवान धातूंच्या किमती सतत वाढत आहेत.

जागतिक तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे चांदीची चमक वाढतच असून चांदीच्या किमती विक्रमी उच्चांक गाठत असताना येत्या काळात चांदीच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. चांदीची किंमत ३० टक्के किंवा त्याहून अधिक कमी होण्याची शक्यता आहे. चांदीची किंमत १ लाखापर्यंत घसरू शकते. ३ लाखापेक्षा जास्त किमतीच्या चांदीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळू शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात चांदीची मागणी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. उत्पादक आता सौर पॅनेल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तंूमध्ये चांदीचा पर्याय शोधत असून उत्पादकांकडे स्वस्त पर्याय असताना ते इतकी महागडी चांदी का वापरतील? महागडी चांदी वापरल्याने उत्पादनाच्या किमतीदेखील वाढू शकतात म्हणून उत्पादक इतका मोठा धोका पत्करणार नाहीत. सोन्या-चांदीच्या आकाशाला भिडलेल्या किमती आणि दिवसागणिक या किमतीत होत असलेली वाढ पाहता बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरताना दिसते आहे.

बल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगाने सोने दराविषयी मोठे भाकित केले होते. आर्थिक संकट हे पारंपरिक बँकिंग प्रणाली प्रभावित करू शकते. त्यामुळे अनेक लोक सोन्या-चांदीत अधिकाधिक गुंतवणूक करतील असे त्या म्हणाल्या होत्या. सोन्याच्या किमती २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असे भाकित होते. सध्या सोन्याचा भाव १० ग्रॅमला १ लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. सोने-चांदीचे दर उच्चांक प्रस्थापित करीत असताना सध्या एक धातू शांत आहे. तो म्हणजे तांबे. काही वर्षांपूर्वी तांब्याचा वापर मुख्यत: बांधकाम आणि कारखान्यापुरताच मर्यादित होता. रिअल इस्टेट किंवा उत्पादन क्षेत्र मंदावले की तांब्याची मागणीही घटायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता तांबे हे डिजिटल जग आणि ग्रीन एनर्जी या दोन मोठ्या बदलांचा महत्त्वाचा घटक बनला आहे.

सध्या तांब्याची मागणीही वाढतेय. कारण इलेक्ट्रिक गाड्या वाढत आहेत, सोलर-विंड एनर्जी प्रकल्प वाढत आहेत आणि डेटा सेंटर्स उभे राहत आहेत. या सा-यांसाठी तांबे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात तांब्याची मागणी वाढणार असून ते ‘नव्या युगाचं सोनं’ ठरू शकेल. इलेक्ट्रिक कारमध्ये पेट्रोल कारच्या तुलनेत सुमारे तीनपट जास्त तांबे लागते. रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प, चार्जिंग स्टेशन आणि स्मार्ट ग्रिडस् यांना तांब्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात तांब्यातही गुंतवणूक वाढू शकते. तांबे दीर्घकाळासाठी मजबूत वाटत असले तरी तांब्यातील गुंतवणूक जोखमीची ठरू शकते. कारण आर्थिक मंदी आल्यास त्याची मागणी अचानक घटू शकते. तांब्यातील गुंतवणूक सोन्यासारखी ‘सुरक्षित’ नाही. सध्या सोन्याने दीड लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

सध्या सोन्याचा दर तोळ्यामागे १,५४,८०० रुपये आहे. सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर सोने खरेदी करणा-यांच्या संख्येत मोठी घट होईल. सध्या चांदीचा बोलबाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने जगभरात खळबळ माजली असून चांदीचा विस्फोट झाला आहे. ‘ग्रीनलँड’संदर्भात जूनपर्यंत करार झाला नाही, तर युरोपीय देशांवर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लावला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार घाबरले असून त्यांनी आपले पैसे सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्या-चांदीत वळवले आहेत. चीनमध्ये चांदीची मागणी वाढली आहे. चांदी ही आता फक्त दागिने तयार करण्यासाठी उरलेली नाही. सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चांदीचा वापर अनिवार्य झाला आहे. त्यामुळे चांदी ‘भाव’ खातेय!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR