भोंदूबाबा प्रकरण भोवले, महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडले
मुंबई : प्रतिनिधी
नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात महिला अत्याचार प्रकरण रूपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले आहे. या कारणावरून रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकर यांनी आपला राजीनामा त्यांना सोपविला. रूपाली चाकणकर यांनी त्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात महिला अत्याचार प्रकरण सध्या गाजत आहे. या भोंदूबाबाशी रूपाली चाकणकर यांचे निकटचे संबंध असल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. विरोधी पक्षांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळयांनीच चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी नेमून सखोल चौकशी करायची त्यांनी मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एकूणच प्रकरणात आधीपासूनच कठोर भूमिका घेतली होती. त्यांना या भोंदूबाबाच्या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी झिरो ईन करण्यास सुरूवात केली होती. म्हणजेच कायद्याचा पाश आवळण्यास कठोरपणे सुरूवात केली होती. महिलांवर अशा प्रकारे अत्याचार होत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस अधिका-यांना आदेश दिल्याचे समजते. सर्वसाधारणपणे असे प्रकरण बाहेर आल्यानंतर जेव्हा विरोधी पक्ष आक्रमक होतात तेव्हा एसआयटी स्थापन होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची वाट न पाहता डॅशिंग महिला पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी तात्काळ स्थापन केली.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नाशिकच्या अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. एका व्हिडीओमध्ये चाकणकर या नराधम अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत तर दुस-या एका व्हिडीओत त्यांनी खरातची तुलना विठ्ठलाशी केली आहे. चाकणकर आणि खरातचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यावरून अशोक खरातच्या काळ््या कृत्यांना चाकणकरांचा वरदहस्त आहे का, अशी चर्चा सुरू झाली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर
राजीनाम्याचे निर्देश
चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे समजते. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला.
राष्ट्रवादीतील हा
तिसरा राजीनामा
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीतील हा तिसरा राजीनामा आहे. या आधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
००००००००००

