किल्लारी : वार्ताहर
शेतातून घराकडे निघालेल्या पती-पत्नीस आडवून दागिण्यासह ८५ हजार रुपयांचे मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि. २५ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खरोसा (ता औसा) येथील सौ कमल सुभाष क्षीरसागर व पती सुभाष क्षीरसागर त्यांच्या शेतातील कामे करून संध्याकाळी घराकडे येत आसताना शेळके यांच्या पेट्रोल पंपासमोरील शेतातील पाऊल रस्त्यावर अनोळखी तिघे जण दुचाकीवर येऊन वाट आडवून पतीस सु-याचा धाक दाखवुन पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दोन मंगळसूत्र (किमत ५०००० हजार), मोबाईल (किंमत १० हजार), कानातील फुले सरपाळी (किंमत २५ हजार) असे एकूण ८५ हजाराचे दागिणे घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे.
यापूर्वीही अशी वाटमारी लामजना ते किल्लारी जाणारे रस्त्यावर झाली होती. त्याचा तपास अद्याप पोलिसांना लावता आलेला नाही. पुन्हा तसाच प्रकार घडल्यामुळे किल्लारी परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारे चो-या करणा-या चोरांचा तपास लावणे हे पोलीसापुढे आव्हान झाले आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल गणेश यादव यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे तपास लावतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.