चाकूर : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले व चाकूर शहराचे वैभव असलेल्या विश्वशांती धाम मंदिरासाठी सर्वात पहिल्यांदा निधी मी जिल्हा परिषद सदस्य असताना दिला होता व आता तब्बल दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता सभागृहासाठी दिली असून लवकरच ते काम पूर्ण होऊन चाकूरच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले.
चाकूर येथे महेश गिरके यांच्या मन्मथ स्वामी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, चाकूरद्वारा संचलित संस्कार सांप्रदायीक निवासी शिक्षण संस्थेचा ८ वा वर्धापन दिन समारंभ चाकूर येथे आयोजित करण्यात आला होता. नामदार बाबासाहेब पाटील बोलत होते. तालुक्याच्या विकासात भर घालण्यासाठी आवश्यक असलेली विकास कामे येत्या काळात हाती घेण्यात येणार आहेत. सर्वांगीण दृष्ट्या मतदारसंघ सक्षम करण्याचा प्रयत्न राहील, असे मत यावेळी ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. या संस्कार केंद्राच्या माध्यमातून सर्व तरुणांना संस्कार देणे गरजेचे असून आजची आपली हिंदू संस्कृती विद्यार्थ्यांना अवगत करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संस्कार केंद्रासाठीही आवश्यक तो विकास निधी मी भविष्य काळात देणार असल्याचे ना. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
यावेळी श्री गुरु १०८ सिद्ध दयाळ बेटमोगरा महाराज, कीर्तन केसरी भगवंतराव पाटील चांभरगेकर महाराज, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, उपनगराध्यक्ष साईराज हिपाळे, शिवसेना नेते सुभाष काटे, नितीन रेड्डी, अनिलराव वाडकर, शिवदर्शन स्वामी, संदीप शेटे, मन्मथ आप्पा पालापुरे, मोहम्मद सय्यद, पपन कांबळे, उमाकांत शेटे, नागोराव पाटील, बालाजी सूर्यवंशी, रवींद्र कुलकर्णी, गणेश स्वामी, सचिन तोरे, आयोजक महेश महाराज मिरकले तसेच निवासी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.