27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरचाकूर तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान

चाकूर तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर शहर व परिसरात सोमवारी दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठाही बंद झाला होता. रविवारी दि २२ फेब्रुवारी रोजीही संध्याकाळी उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली होती.
सोमवारी  सायंकाळी झालेल्या पावसामुळे व प्रचंड वा-यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच चा-याचेही नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतातील ज्वारी, गहू, हरभरासह आंबा, द्राक्षे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांही शेतक-यांनी गव्हाचे पीक काढून ठेवले होते मात्र अवकाळी पावसामुळे गहू भिजला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाकूर शहरातील विठ्ठल डाके, पंडित मोरेसह इतर शेतक-यांचे रब्बी हंगामातील पीक पावसामुळे खराब झाले आहे  तसेच डोंगरज, शेळगाव शेत शिवारात ही वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरणी, गांजूर शेत शिवारातही अवकाळी पावसामुळे शेतक-यांची मोठी धावपळ उडाली होती.
 घरणी ,घारोळा येथील रब्बीची ज्वारी जमीनदोस्त झाली आहे तसेच शिरीष आणि आकाश शिंदे यांच्यासह अन्य शेतक-यांचे कापून ठेवलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गांजूर गावात तसेच शेतशिवारात वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतातील रब्बी हंगामातील पिंकाचे नुकसान झाले आहे. एकंदरीत तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात रब्बी हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR