चाकूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील पेट्रोल,डिझेल आणि सीएनजीसाठी पेट्रोल आणि डिझेल पंपावर वाहनांची गर्दी होत आहे. इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. तालुक्यात सध्या १६ पेट्रोल पंप सुरु असून चाकूर शहराच्या ४ बाजूनी चार पंप सुरु आहेत. चापोलीकडे जाताना तीन पेट्रोलपंप आहेत, झरी बु. जवळ एक पेट्रोलपंप, मोहदळजवळ एक, घरणी शिवारात दोन पेट्रोल पंप, नळेगाव जवळ दोन पेट्रोलपंप, येरोळ मोड जवळ एक पेट्रोलपंप असे पेट्रोल पंप आहेत. मागणी प्रमाणे कंपनीकडून पुरवठा होत नाही, मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे ग्राहकांना पेट्रोल, डिझेल मागणीप्रमाणे मिळत नसल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. एका पंपावर सीएनजी मिळते तिथे वाहनांची गर्दी असते.
वाहन चालक आणि ग्राहक यांना विचारले असताना ते म्हणतात आम्हाला आमच्या वाहनांचा जेवढे पेट्रोल,डिझेल आणि सीएनजी पाहिजे असते तेवढे मिळत नाही. याबाबत पंप मालकाशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही कंपनीस आम्हाला एवढे इंडेन पाठवा असे लेखी सांगतो मात्र ते तेवढे इंधन पाठवत नाहीत, यामुळे ही तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. तसेच काही वाहनधारक दर वाढतील या भीतीने अधिक इंधन भरत आहेत त्यामुळेही इंधन टंचाई होत आहे. प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हाला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आदेश आले आहेत त्यानुसार आम्ही नियमानुसार निर्णय घेऊन संबंधित दोषी पंपावर कारवाई करू असे सांगितले आहे. चाकूर तालुक्यात एचपी ११ पेट्रोल पंप, एचपी प्लस सीएनजी १ पेट्रोल पंप,भारत २ पेट्रोल पंप,एपीएमसी १ पेट्रोल पंप आणि इंडीयन अॉईल एक पंप बंद असे एकूण १६ पंप आहेत.

