चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यात कांही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊन झाल्याने कोवळ्या पिकांना संजीवनी मिळाली मात्र वन्यप्राण्यांचा विशेषत: हरिणांचा उपद्रव वाढल्यामुळे कोवळ्या पिकांना धोका वाढला असून बळीराजाने चिंता व्यक्त केली आहे. चाकूर तालुक्यात यंदा खरिपाची लवकर पेरणी झाली. काही भागात पावसाअभावी पेरणी रखडली होती तर काही ठिकाणी बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले. शनिवारी तालुक्यात थोडा पाऊस झाल्याने कोमेजून जाणा-या पिकांनी तग धरलेले आहे परंतु उगवण झालेल्या पिकांवर वन्य प्राण्यांकडून नासधूस करण्यात येत आहे.कोवळी पिके डोळ्यासमोर फस्त होत असल्यामुळे शेतकरी राजा दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील घरणी, माहूरवाडी, उजळंब, आनंदवाडी, नायगाव, बोथी भागात उगवलेल्या पिकांवर रानडुकरे, हरणांच्या कळपांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे खरीपाची पेरलेली पिके टिकणे शक्य नाही. वन्यप्राणी पेरलेल्या कोवळ्या पिकांची शेंडे खाऊन पिकांचे नुकसान करीत आहेत. एकीकडे गोगलगाईचाही प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतक-यांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाच्या प्रतीक्षेने शेतकरी पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. पाऊस कधी पडणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. पावसाअभावी दिवसभर उन्हात पिके करपत आहेत. मात्र रात्री हरणांचा कळप मोकाट वावरात फिरून उभ्या पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला असून या वन्यप्राण्यांचा विशेषत: हरिणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

