चाकूर : अ. ना. शिंदे
चाकूर तालुक्यात एकूण २२२ अंगणवाड्या असून केवळ ३२ अंगणवाड्याचा स्मार्ट (डिजिटल) आहेत. ग्रामस्तरावरील समाजविकासाचे अंगणवाडी प्रभावी केंद्र आहे. अंगणवाड्यांना भौतिकदृष्ट्या अद्ययावत केल्यास शैक्षणिक वातावरण निर्मिती होऊन बालकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. तरी शासनाने तालुक्यातील उर्वरीत अंगणवाड्या डिजिटल करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी होत आहे.
सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा, ई लर्निंगची सुविधा, एलईडी टीव्ही, यूएसबी पोर्टल, मुलांसाठी टेबल, खुर्ची, जलशुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे अशी अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज अशी स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याची योजना राज्य शासनाने सात वर्षांपूर्वी केली. मात्र त्यासाठी अजूनही निधीच उपलब्ध झाला नसल्याने शासनाची ही योजना हवेतच आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी गावागावात अंगणवाड्या कार्यरत आहेत. मुलांना पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी व आरोग्य शिक्षण सेवा पुरविल्या जातात. पूर्व प्राथमिक शिक्षणाला बळकट करण्यासाठी ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी काही दिवसापूर्वी नव्याने वर्गवारी करण्यात आली आहे.
त्यात ‘खेळ गट’ ‘छोटा गट’ व ‘मोठा गट’ असे तीन टप्पे निश्चित केले गेले आहेत. अंगणवाड्यात या वर्गाची रचना करून बालकाच्या शारीरिक मानसिक व सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने विकसित केलेला आधारशीला अभ्यासक्रम सुरु केला आहे. अंगणवाड्याची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने सात वर्षांपूर्वी आदर्श अंगणवाडी अर्थात स्मार्ट अंगणवाडीची घोषणा केली होती. राज्यातील अंगणवाड्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांश अंगणवाड्याना स्वत:ची हक्काची इमारत मिळाली आहे. अशा इमारतीमध्ये स्मार्ट अंगणवाडी उपक्रम राबविल्यास तो कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे शासनाने आतातरी स्मार्ट अंगणवाड्यांसाठी निधी द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

