चाकूर : प्रतिनिधी
येथील धोकादायक झिरो पॉंईट बायपासवर गेल्या कांही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कांही निष्पाप नागरिकांचे जीव गेल्याची घटना घडली होती. हा धोकादायक झिरो पॉईंट अपघाती रस्ता अखेर बंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दखल घेऊन महामार्ग प्रकल्प व्यवस्थापकांशी संपर्क साधून निर्देश दिले आहेत.
या अपघाताच्या घटनेची दखल राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प व्यवस्थापक महेश पाटील यांना या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प व्यवस्थाकांनी या निर्देशाची दखल घेत चाकूर येथे जो अपघाती चौक आहे तो पूर्णत: बंद केला असून चाकूर शहरातून अहमदपूरकडे जाणारी वाहतूक आता सत्यसाई रोडच्या उड्डाण पुलावरून वळवण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्गाने घेतला आहे.
सध्या हा अपघाती चौक बंद केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच या ठिकाणी अजून काय उपाययोजना करता येतात या संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील महामार्ग अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून भविष्यात असे अपघात घडू नये यासाठी ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी विशेष उपाययोजना करणार आहेत. सध्या तरी ही तातडीची उपाययोजना केल्यामुळे अपघात होणार नाहीत. यामुळे प्रवाशाना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक महेश पाटील यांचे आभार मानले जात आहेत.
















