अमरावती : प्रतिनिधी
चार जणांचा बळी घेत गेल्या १८ दिवसांपासून वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत दहशत निर्माण करणा-या ‘एनपीटी-१’ नरभक्षक वाघिणीचा अखेर नाट्यमय अंत झाला. सोमवारी दुपारी चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा शिवारात तिला जेरबंद करण्यात आले. मात्र, नागपूरच्या गोरेवाडा केंद्रात हलविण्याची तयारी सुरू असतानाच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोर्शी येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संपूर्ण शवविच्छेदन अहवालानंतरच त्यामागील कारण समोर येणार आहे.
बोर वर्धा जिल्ह्यातील अभयारण्यातून बाहेर पडलेली ही वाघीण आष्टी तालुक्याच्या नरसिंगपूर शेतशिवारात पोहोचली. १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी, राजाभाऊ भोयर हे देवळात पूजा करत बसले असताना, या वाघिणीने त्यांच्यावर पहिला प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना ठार केले. १८ ऑगस्टनंतर या वाघिणीने वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडत तळेगाववरून मोर्शीच्या भांबोरा परिसरापर्यंत मैलोन्मैल प्रवास केला.
२७ ऑगस्ट रोजी भांबोरा (ता. मोर्शी) येथील शेतकरी चरणदास ईखे यांच्यावर हल्ला करत वाघिणीने दुसरा बळी घेतला. गेल्या दोन दिवसांत या वाघिणीने आणखी दोन बळी घेतले. ६ बाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात ऊर्मिला बाजीराव ईवणे (२२) ही आदिवासी मुलगी चारा आणायला गेली असता वाघिणीने झडप घालून तिचा जीव घेतला. सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता शिरजगाव कसबा शिवारात वाघिणीने दिनेश ऊर्फ दामू आवारे (४५) या शेतक-यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, वाघिणीने दामू यांचे धड शरीरापासून वेगळे केले.
राजाभाऊ भोयर यांच्या मृत्यूनंतर आर्वीचे आमदार सुमित वानखडे यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी २१ ऑगस्ट रोजीच या वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे येथील मुख्य पशुवैद्यकीय डॉ. हेमराज यांच्या पथकाने, शूटर आणि वन्यजीव रक्षकांच्या मदतीने वाघिणीला अचूक ट्रॅक केले आणि शिताफीने ट्रॅक्युलाइज केले. अमरावती आरआरयूचे वनपाल फिरोज खान यांनी लावलेला डार्ट लागताच काही वेळात वाघीण बेशुद्ध झाली आणि यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.
















