लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक
लातूर: प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान वाटचाल सुरू आहे. आजपर्यंतच्या बँकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्हा बँकेचा कारभार अतिश्य पारदर्शकपणे केल्याने ही बँक लातूर जिल्ह्याचा ‘मानबिंदू’ ठरली आहे. उत्तमरित्या चालत्या बँकेच्या गाडीला आज निवडणुकीच्या निमित्ताने ‘महायुती’कडून खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. हा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी सभासदांमध्ये उमटत आहे.
चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत महायुतीच्या नेत्यांमध्ये नाही. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. खरे तर चांगल्याला चांगले म्हणता आले पाहिजे. परंतु केवळ राजकीय इच्छा, आकांक्षेपोटी हे सर्व करणे जिल्ह्यातील शेतक-यांना अपेक्षित नाही. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे सर्वांना सोबत घेऊन लातूरच्या सहकार चळवळीला पुढे घेऊन जात आहेत. अवसायनात असलेली लातूर जिल्हा मध्यमर्ती बँक त्यांच्याच पुढाकारातून बाहेर पडली. नुसती बाहेरच पडली नाही तर बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्तम बँक म्हणून नावलौकीकही मिळवला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. एक विचार, एक व्हिजन घेऊन जिल्हा बँक पुढे जात असताना महायुतीचे नेते व्हिजन न सांगता फक्त टीका करीत आहेत. हे कुठेतरी थांबेले पाहिजे, अशी भावना बँकेच्या शेतकरी सभासदांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी ४१ नामनिर्देशनपत्रांची
विक्री; ३ नामनिर्देशनपत्र दाखल
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी ४१ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली तर ३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी वि. का. सेवा सहकारी सोसायटी उदगीर मतदारसंघातून भोसले प्रीती चंद्रशेखर, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून सिरसाठ विवेक हरिश्चंद्र व महिला प्रतिनिधी मतदारसंघातून पाटील मनोरमा मनोजराव यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. दि. १४ ऑक्टोबरअखेर एकूण २७० नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली तर एकूण ९ नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लातूर यांच्याकडून प्राप्त झाली.
















