बीजिंग : वृत्तसंस्था
भारताच्या दौ-यावर आलेले फिलीपींसचे राष्ट्राध्यक्ष फेरदिनांद मार्कोस ज्यूनिअर यांनी तैवानसोबत युद्धावरून मोठी घोषणा केली आहे. जर चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाले तर फिलीपींस त्यापासून दूर राहू शकत नाही असे त्यांनी म्हटले. जर तैवानसोबत युद्ध झाले तर अमेरिकन सैन्याला तुमच्या मालमत्तेचा आणि सैन्य ठिकाणांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी त्यांच्या देशाची महत्त्वाच्या भौगोलिक स्थितीचा उल्लेख केला. मार्कोस ज्यूनिअर यांच्या विधानानंतर चीनचा तीळपापड झाला आहे.
जर तैवानसाठी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष झाला तर फिलीपींस यातून बाहेर राहील हा प्रश्नच येत नाही. त्यामागचे कारण म्हणजे आमची भौगोलिक स्थिती आहे. तैवानचा काओहसिंग परिसर फिलीपींसच्या लाओआगवरून विमानाने ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल, पूर्ण युद्ध सुरू झाले तर आम्ही त्यात सहभागी होऊ शकतो. तर निश्चितच आम्हाला आमचा भाग आणि अखंडतेचे रक्षण करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. फिलीपींस सातत्याने चुकीचं आणि चिथावणीखोर विधान करत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. फिलीपींसला तैवानमध्ये काम करणा-या त्यांच्या लोकांचा हवाला देत दुस-या देशाच्या सांप्रदायिकेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. फिलीपींसने आगीशी खेळणे बंद करावे असा इशारा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

