शिनुआ : अंतराळात आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी चीनने एका नव्या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. चीननें शेनझोउ-२१ मोहिमेअंतर्गत आपल्या तियानगाँग अंतरीक्ष स्थानकात तीन प्रवाशांसह उंदरांची दोन ‘जोडपी’ (चार उंदीर) पाठविले आहेत. त्यांचे हे अंतरीक्ष यान विक्रमी वेगाने तियानगाँगची परिक्रमा करीत आहे. या मोहिमेत चीनचे अंतराळवीर काही प्रयोगही करणार आहेत. त्यासाठीच त्यांच्याबरोबर या चार उंदरांनाही अंतराळात पाठविण्यात आले आहे. यातील दोन उंदीर नर आहेत, तर दोन उंदीर मादी. या उंदरांची निवडही कठोर प्रक्रियेतून केली गेली आहे. त्यांना ६० दिवसांचे अतिशय कठीण प्रशिक्षणही दिले गेले.
या चार उंदरांनी ३०० उंदरांना हरवून आपली जागा पक्की केली आहे. ही पहिलीच वेळ आहे की चीनने लहान सस्तन प्राणी आपल्या स्पेस स्टेशनवर पाठविले आहेत. चिनी विज्ञान अकादमीचे अभियंता हान पेई यांच्या म्हणण्यानुसार, अंतराळात या उंदरांचे, त्यांच्यावर होणा-या बदलाचे आणि त्यांच्या आचरणाचे अतिशय बारकाईने निरीक्षण करण्यात येईल. शून्य गुरुत्वाकर्षण आणि बंद वातावरणात त्यांच्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचाही अभ्यास या प्रयोगात केला जाणार आहे.
या मोहिमेदरम्यान अंतराळवीर २७ वैज्ञानिक प्रयोग करतील, ज्यात जैवतंत्रज्ञान, अंतरीक्ष वैद्यक आणि पदार्थ विज्ञानाशी संबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
झांग होंगझांग हे पेलोड तज्ज्ञ आहेत, जे अंतराळवीर होण्यापूर्वी नव्या ऊर्जेवर आणि नव्या पदार्थांवर संशोधन करीत होते. त्यांच्या आधीच्या अंतराळवीरांप्रमाणेच ते देखील साधारण सहा महिने अंतराळ केंद्रात राहतील.















