नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यादव म्हणाले की, महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मग हा अपघात कसा झाला?, असा सवालही त्यांनी केला. जर हे चुकीचे असेल तर माझा राजीनामा देऊ इच्छितो, असेही ते म्हणाले.
अखिलेश यादव म्हणाले की, महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेले आणि सापडलेले या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीच्या उपलब्धतेची आकडेवारी संसदेत मांडली पाहिजे.
महाकुंभ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि सत्य लपवणा-यांना शिक्षा झाली पाहिजे, असेही अखिलेश यादव म्हणाले. जर चूक नव्हती तर आकडे का दाबले, लपवले का?, असा सवालही त्यांनी केला. देवालाच माहिती. किती लोकांचा मृत्यू झाला आहे? चप्पल, कपडे आणि साड्या आजूबाजूला पडल्या होत्या आणि त्या सर्व जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलींनी उचलल्या होत्या. त्या कुठे फेकल्या हे कोणालाही माहिती नाही.