बाभळगाव : प्रतिनिधी
भारतीय कृषी संस्कृतीचा आत्मा असलेल्या पोळा सणाचा उत्साह शुक्रवारी सर्वत्र दिसून आला. या विशेष दिवशी, बाभळगाव येथे विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले. शेतकरी आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणा-या बैलांच्या अनोख्या नात्याचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला.
या प्रसंगी पोळा सणाबद्दल त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. पोळा हा सण केवळ बैलांची पूजा करण्याचा दिवस नसून वर्षभर शेतीत घाम गाळणा-या त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आहे. ग्रामीण जीवनातील हा उत्सव आपल्याला मातीशी आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या अतूट नात्याची आठवण करून देतो.
या सोहळ्यानिमित्त श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी बैलांची मनोभावे पूजा केली. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, भारतीय शेतीमध्ये बैलांचे महत्त्व अनमोल आहे. यांत्रिकीकरण वाढत असले तरी शेतीचा खरा आधार बैलच आहेत. त्यांच्या श्रमामुळेच शेतकरी त्याच्या शेतात सोन्यासारखे पीक पिकवू शकतो. या प्रसंगी उपसरपंच गोविंद देशमुख, अविनाश देशमुख, महादेव जटाळ, महादेव देशमुख, भीमा शिंदे, सचिन मस्के, मुक्ताराम पिटले आदी उपस्थित होते.

