पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले, राज्यातही आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी
नीटसह अनेक परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकार समोर आल्याने संतप्त झालेल्या तरुणांच्या भावनांचा उद्रेक आज राजधानी दिल्लीत दिसला. बळाचा वापर करून दिल्लीतले आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू असताना देशभर याचे पडसाद उमटत असून, मुंबईसह राज्यातील अनेक शहरात आज याचे पडसाद उमटले. मुंबईतील दादर येथे चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. पुणे आणि नागपुरातही विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
कॉकरोच जनता पार्टीने आज संसदेवर मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी दिल्लीच्या जंतरमंतर येथून निघालेला मोर्चा बळाचा वापर करून रोखला. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने सोमवारी संध्याकाळी ४ वाजता चैत्यभूमी परिसरात आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनासाठी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमू लागले. पण इथे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा आधीच दाखल होता. आंदोलक चैत्यभूमीवर येताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली.
मुंबईत जमावबंदीचे आदेश
दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरात आज उमटले. त्यामुळे पुण्यापाठोपाठ मुंबईतही ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश काढण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
३५० आंदोलक ताब्यात
मुंबईतील ऐतिहासिक चैत्यभूमी परिसरात आंदोलनाला परवानगी नव्हती. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांविरोधात आता शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईबाबत मध्य प्रादेशिक विभाग-३ चे पोलिस उपायुक्तांनी अधिकृत माहिती दिली. येथे कोणत्याही आंदोलनास परवानगी नसल्याने ही कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातही पडसाद
नीट पेपरफुटीवरून कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन सुरू असतानाच आज संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने आंदोलक संसदेवर धडकले. दरम्यान, या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठवाड्यातही तरुणाई रस्त्यावर उतरली असून, ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा धडकला आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
















