मुंबई : प्रतिनिधी
रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही. ते एकमेकांना कधी भेटलेले नाहीत. त्यांचा कार्यकाळ, कालखंड वेगवेगळा आहे, असे अनेक इतिहासकारांनी सांगितल्यानंतरही हे जाणूनबुजून रामदास स्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरू करण्याच्या का मागे लागले आहेत. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरू-शिष्याचे नाते दाखवण्याचा संदर्भ दिला जात असेल, तर आम्ही त्याचा निषेध करतो. ही इतिहासाची तोडमोड असून, ती आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव-शाहू-फुले-आबंडेकर, गाडगे महाराज-तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे धादांत खोटे बोलणारे लोक येत असतील तर आणि धर्मपीठाच्या माध्यमातून त्यांची संलग्नता दाखवली जात असेल, तर संघाचीही ही मानसिक विकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या विचारांनी देशाला व महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे व महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, छिंदम, या भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर जय भगवान गोयल या भाजपा नेत्याने ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’, नावाचे पुस्तक लिहून महाराज व मोदींची तुलना केलेली आहे, याचा संताप जनतेमध्ये आहे, असा दावा सपकाळ यांनी केला.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. त्यांनी त्यांना थांबवले पाहिजे होते. राज्यभरात या विरोधात तीव्र संताप आहे. शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणा-या लोकांवर सरकार कारवाई करत नसल्याने चुकीचा संदेश जात आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

