छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मित्रांमध्ये स्पोर्टस् बाईकच्या खरेदी-विक्रीवरून क्षुल्लक वाद झाला. या वादानंतर तिघांनी एका मुलाचे अपहरण केले. चालत्या दुचाकीवरून ओढून खाली पाडत कारमध्ये टाकून पसार झाले. भररस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर सिडको पोलिसांनी सात तासांत तरुणाची सुटका केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बजरंग चौक ते वाळूज- रांजणगावदरम्यान हा थरार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय रोहन (नाव बदलले) शुक्रवारी रात्री ११ वाजता मित्र आर्यनसोबत बाहेर गेला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास ते दुचाकीने मेडिकव्हर रुग्णालयाकडून बजरंग चौकाच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान कारमधून दोघांनी उतरून त्यांना अडवून रोहनला खाली ओढले.
रोहनला ६ जणांनी कारमध्ये डांबले आणि कारमधून चौघे तर दोघे दुचाकीवरून पसार झाले. घडलेला सगळा प्रकार तातडीने आर्यनने रोहनच्या आईला कळवला. रोहनच्या आईने तत्काळ सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. रोहनच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यात विवेक गणेश सोनवणे (१९), पांडुरंग माधव सोनवणे (२१), रोहन सुनील डव्हळे (१९) यांच्या मुसक्या आवळल्या. तर त्यांचे आणखी साथीदार पसार झाले आहेत. दरम्यान अन्य अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

