छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरच्या आहिल्यानगर रोडवर रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तर रिक्षात अडकलेल्या रिक्षाचालकाला अग्निशमन दलाने रेस्क्यू करून बाहेर काढले. दरम्यान या अपघातात रिक्षाचालकासह २ जण ठार झाल्याची माहिती आहे, तर २ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर यात रईस हासिम शेख, रुक्मिणी येणगे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर शीतल मोरे पायल वरदे या दोघी जखमी प्रवासी व्यक्तींची नावे आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड (देव्हाडी) ते रामटेक मार्गावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणा-या एका वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक गोंदियाच्या दिशेने जात होता. याच दरम्यान स्टेशन टोली येथील रहिवासी दयाराम पुनाजी मोहरकर हे आपल्या दुचाकीने जात असताना, ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दयाराम मोहरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

