वाशिम : प्रतिनिधी
संभाजीनगर-नागपूर द्रुतगती महामार्गावर पेडगावजवळ आज (दि. २३) सकाळी ७ वाजता ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात मुकेश नाटे (वय ३६, कारंजा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अशोक वानखडे (वय ५५, चालक) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून कारंजा येथे जाणारी सिंध कंपनीची ट्रॅव्हल्स आणि नागपूरहून संभाजीनगरकडे जाणारा ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रकचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट ट्रॅव्हल्सवर आदळला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले, तर २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलवण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर कारंजा, सेलूबाजार आणि वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.
















