छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील सर्वांत मोठ्या दरोड्याच्या प्रकरणाला नवे वळण लागले असून पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोड्यातील आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांना हप्ते देत असल्याचे समोर आले आहे. या हप्त्यांची यादी २०२३ मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केली होती. संभाजीनगर पोलिस प्रति महिन्याला अवैध धंद्यातून साठ लाख रुपये हप्ता घेत असल्याची एक यादी जाहीर केली होती. त्यामध्ये देशी दारू विकण्यासाठी यातील आरोपी योगेश हसबे हा प्रति महिना २० हजार रुपयांचा हप्ता देत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी पडलेल्या सर्वांत मोठ्या दरोडा प्रकरणानंतर हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून आता पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. तर संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी साडेपाच किलो सोन्यावर डल्ला मारणारा योगेश हसबे याला घरात मोठे घबाड असल्याची यापूर्वीच टीप मिळाली असल्याचेही समोर आले आहे.
योगेश हसबेचे (वय ३१ वर्षे) मूळ गाव बुलडाणा असून तो हल्ली सालमपुरे रोड, वडगाव मुक्कामी आहे. तो २०१२ पासून दारूविक्रेता असून नंतर त्याने वडगाव कोल्हाटीमध्ये हॉटेल काढले. त्यात वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांनी योगेश दारूसाठी पोलिसांना २० हजार रु. हप्ता देत होता असा आरोप केला आहे. हसबेचे वडील वडगाव कोल्हाटी येथे टपरी चालवत असून त्यात त्याने दारूचा व्यवसाय सुरू केला. वडिलांनंतर योगेश हसबेने दारूविक्री सुरू ठेवली आणि गावात दारू विक्रेते गट तयार झाले. यातून हसबेने पोलिसांना हप्ता दिल्याचे बोलले जात आहे. हसबे पोलिसांजवळ गेला आणि त्यानंतर त्याने परिसरातील वेश्याव्यवसायाला कंडोम विक्री केली. नंतर स्वत: साई गार्डन हॉटेल सुरू केले आणि त्यात वेश्याव्यवसाय सुरू केला. यामध्ये पोलिसांच्या हप्त्याचे कलेक्शन असल्याचा आरोप केला जात आहे.