नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महागाई कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे मापक आहे. थोडी महागाई सामान्य असते, पण जेव्हा लक्षणीयरीत्या वाढते, तेव्हा बाजाराची परिस्थिती खूप कठीण होऊन जाते. गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवरील महागाईने उच्चांक गाठला असून काही देशांमधील महागाई दर इतका प्रचंड आहे की इथे लोकांना जगणेही मुश्किल झाले आहे. दरम्यान, भारतात महागाईची झळ कमी वाटत असली तरी युद्धामुळे वाढलेल्या किमती आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे भारतीयांना फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील लोकांना महागाईचा फटका बसत आहे, पण जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात महागाई कमी असल्याचा सरकार नेहमीच दावा करत आले आहे. तीव्र आर्थिक संकटे आणि चलनाचे अवमूल्यन घटक २०२६ च्या सुरुवातीपर्यंत सर्वाधिक चलनवाढीस प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. २०२६ वर्षात व्हेनेझुएलामध्ये सुमारे २५२ टक्के ते २६९.९ टक्के वार्षिक अंदाजासह जगातील सर्वोच्च चलनवाढीचा दर राहिला आहे. त्यानंतर सुदान, दक्षिण सुदान आणि झिम्बाब्वे या इतर देशांमध्येही जनतेला तीव्र चलनवाढीचा सामना करावा लागत आहे.
सुदानमध्येही महागाई दर सध्या १०० टक्के ते १७१ टक्क्यांपर्यंत आहे. हा दर मार्च २०२६ मध्ये अंदाजे ४०.२२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तरीही युद्धामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, चलनाचे अवमूल्यन आणि खरेदीशक्तीत झालेली घट यांमुळे दर अजूनही उच्च राहिला आहे. दक्षिण सुदानचा महागाईचा दर ९७ टक्के असून कमजोर अर्थव्यवस्था आणि मागच्या वर्षांपर्यंत चालत आलेले गृहयुद्ध या कारणांमुळे येथील परिस्थिती खूपच बिकट आहे. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, तेल निर्यातीत घट झाली आणि देशात पुराच्या तडाख्याने स्थिती आणखी खालावली. दरम्यान, दक्षिण अमेरिकेतील आणखी एका देशातील जनता उच्च महागाईचा सामना करत आहे. अर्जेंटिनामध्ये सध्या ३२ टक्के ते ४१ टक्क्यांदरम्यान महागाई वाढली आहे, पण २०२४ मधील उच्चांक लक्षणीयरीत्या खाली आणण्यात सरकारला यश आले.
युद्धाच्या आखाड्यात अमेरिकेला काट्याची टक्कर देणा-या इराणमधील जनताही गेल्या काही वर्षांत उच्च ते अति-उच्च महागाईला तोंड देत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच सरकार एक लाखाची इराणच्या मध्यवर्ती बँकेने चलन जारी केले होते तर मे २०२६ च्या अहवालानुसार इराणमधील महागाईचा दर खूप जास्त असून सुमारे ६८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
झिम्बाब्वेमध्ये महागाईचा धमाका
झिम्बाब्वेमध्येही ८१ टक्के ते १७२ टक्के दरम्यान महागाईचा प्रभाव पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळात येथील महागाईत घट नोंदवली गेली तरीही अजूनही देशात उच्च महागाईने जनतेची होरपळ होत आहे. २०२०-२०२३ या काळात झिम्बाब्वेला जगातील काही सर्वाधिक चलनवाढीच्या दरांचा सामना करावा लागला. जे अनेकदा ५०० टक्क्यांपेक्षाही अधिक होते.
व्हेनेझुएलात सर्वाधिक महागाई
महागाईच्या आगीत होरपळणा-या देशांच्या लिस्टमध्ये दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाचा पहिला नंबर लागतो. जगात सर्वाधिक तेलाचा साठा असलेल्या व्हेनेझुएलामध्ये महागाईने कहर केला आहे. व्हेनेझुएलामधील उच्च महागाई अनेकदा ‘अतिमहागाई’ मध्ये बदलली आहे, जी प्रामुख्याने सरकारी अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी केलेली मोठ्या प्रमाणावरील चलन छपाई, तेल उत्पादनात झालेली घट आणि गंभीर आर्थिक गैरव्यवस्थापन यामुळे उद्भवली आहे.
तुर्कीमध्ये महागाई
दर ३२.३७ टक्के
भारताचा शत्रू देश म्हणून ओळखल्या जाणा-या तुर्की या देशात ३२ टक्के ते ३४ टक्क्यांपर्यंत महागाई वाढली आहे. एप्रिल २०२६ मध्ये गृहनिर्माण, अन्न आणि वाहतूक क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे तुर्कीचा अधिकृत वार्षिक महागाई दर मार्चमधील ३०.८७ टक्क्यांवरून वाढून ३२.३७ टक्क्यांवर पोहोचला असून तुर्कीमधील महागाईचा दर १९६५ पासून सरासरी ३५.३७ टक्के राहिला आहे.
















