सांगली : प्रतिनिधी
मत चोरीच्या मुद्द्यावरून खासदार विशाल पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या सुरात सुर मिसळत जत विधानसभा मतदारसंघातील गोपीचंद पडळकर यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत जत विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तर मताची चोरी करून हरवला गेला, असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला. जतमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी हा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर केला.
मतचोरीच्या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. खासकरून जत मतदारसंघात विधानसभेल मतचोरीचा प्रकार ठरवून केला गेला. जो पाच पिढ्यांपासून जत मतदारसंघातला रहिवाशी आहे त्याची जात, धर्म बघून त्याचे मतदारयादीतून नावच उडवलं आणि जो मतदारसंघातला रहिवासी नाही त्याचं मतदारयादीत नाव सापडलं असे प्रकार समोर आल्याचे खासदार विशाल पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, ज्या गावात ५०० मतदार आहेत त्या गावातील मतदान १५०० झाले. आपण गाफील राहिलो आणि त्यामुळे कुठूनही माणसं आली आणि मतदान करून गेली. जत येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी निवड कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार विशाल पाटील यांनी हा आरोप केला. यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, जतचे माजी आ. विक्रमसिंह सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
नेतृत्व तयार करण्याची हीच वेळ : डॉ.विश्वजित कदम
दरम्यान, काँग्रेस पक्षासाठी आव्हानात्मक काळ आहे, मात्र अशा काळातच संघटनेची खरी ताकद समोर येते. काँग्रेस विचारधारेचा पाया लोकशाही, समानता आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत आणि विश्वासार्हता जपणारा असून युवापिढीला तो भावतो आहे. फक्त आता विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.

