लातूर : प्रतिनिधी
या निवडणूक निकालाकडे आम्ही पूर्णपणे सकारात्मक आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने पाहत आहोत. काँग्रेस पक्षाने संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रचार यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि जनतेच्या प्रश्नांशी थेट संवाद साधणारी राबवली. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून केलेल्या प्रचाराला जनतेने दिलेला हा कौल आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यास आमचे प्राधान्य राहील, असे लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार निवडून आले आहेत, ते सर्वजण अनुभव, अभ्यास आणि लोकांशी असलेली बांधिलकी लक्षात घेता निश्चितच चांगले, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना गती देणे, जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून काम करणे हे आमचे प्राधान्य राहील. या निवडणुकीत भाजप निम्म्यावर आले असून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. हा निकाल म्हणजे केवळ संख्यात्मक यश नसून, काँग्रेसच्या विचारधारेवर, धोरणांवर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे सार्थ ठरवू. लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकास साधण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने जनतेसोबत उभा राहील. असे सांगून विजयी काँग्रेस उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले.

