चाकूर : प्रतिनिधी
जनतेच्या हक्कासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवित असून, सत्तेसाठी नाही. सेवेसाठी राजकारण असून शिक्षण, रोजगार, रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य असेल, या माध्यमातून वडवळ गट विकसित करणार आहे. सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वाची साथ मिळाली असल्याने या गटाचा विकास करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन अॅड. माधव कोळगावे यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार चाकूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. माधव निवृत्ती कोळगावे हे वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उभे आहेत. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला असून सर्वच उमेदवारांनी निवडणूक रिंगणात प्रचाराला जोरदार सुरूवात केली असून प्रचारात आता वेग घेतला आहे.
तालुक्यातील वडवळ जिल्हा परिषद गटातही निवडणूक प्रचार जोरात सुरू असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून अँड. माधव कोळगावे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क व त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव आणि सर्व समाजाशी असलेली त्यांची नाळ यामुळे या मतदारसंघातील मतदारांचा हात त्यांना साथ देणार असल्याची चर्चा होत आहे. या दोन्ही पंचायत समिती गणातून अॅड.माधव कोळगावे यांनी दोन दौरे पूर्ण करून सकारात्मक प्रतिसाद मिळविला आहे. जिल्हा परिषद गटातील वडवळ ,आष्टा ,मोहदळ ,नांदगाव ,अंबुलगा, लातूर-रोड, मोहनाळ यासह सर्व गावातील जनता स्वयंस्फूर्तपणे हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून अॅड. कोळगावे यांच्या हातात हात घालून प्रचारात उतरले आहेत.

