21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रजनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

कोल्हापूर : प्रतिनिधी
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे हे रात्री प्रचाराहून परत येत असताना अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात घोरपडे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाला आहे. या घटनेचे वृत्त मतदारसंघात समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. हजारो कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महायुतीत सामील असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे हे जांभळी खो-यातील मानवाड (ता. पन्हाळा) येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. परत येताना मानवाडलगत रस्त्याशेजारी सहा-सात अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. ते कार्यकर्ते असावेत किंवा काही त्यांना अडचण असावी, असा घोरपडे यांचा समज झाला. त्यांनी गाडी बाजूला घेतली. घोरपडे गाडीतून उतरले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता काठी आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला.

घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉ. शुभम जाधव हे खाली उतरले. यावेळी संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करणारे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. शेतवाडीतून पळत असताना त्यांनी दगडफेक केली. त्यामध्ये गाडीचेही नुकसान झाले. संताजी घोरपडे यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला आहे. त्यांना जवळच्या कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस करण्याकरिता गर्दी केली. प्राथमिक उपचार करून घोरपडे यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संताजी यांची गाडीही फोडली
संताजी घोरपडे यांच्या विरोधातील उमेदवार शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांचे कार्यकर्ते शिंगणापूर ग्रामपंचायत सदस्या सविता सावरे यांचे पती रामचंद्र सावरे यांची गाडी रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी फोडली. रामचंद्र सावरे हे करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचे समर्थक आहेत. गाडीवर करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचे फोटो आणि स्टिकर्स लावण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR