लातूर (बोरी) : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाला जनसेवेचा मोठा आणि गौरवशाली वारसा असून देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचे योगदान बहुमोल आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भातांगळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनील नामदेव पडीले, बोरी पंचायत समितीच्या उमेदवार सौ. शोभा चंद्रकांत बरचे तसेच भातांगळी पंचायत समितीचे उमेदवार उमेश अमृतराव बेद्रे हे उपस्थित होते.
माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही गावांच्या विकासाची निवडणूक आहे मात्र भाजपचे नेते द्वेषाचे आणि जनतेची दिशाभूल करणारे राजकारण करीत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला असून ग्रामीण भागातील विविध शासकीय योजनांमध्ये शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे भाजपविरोधात मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीत आल्यानंतर भ्रष्टाचार संपवून सर्व शासकीय योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसचे उमेदवार हे जनतेचे प्रश्न सोडवणारे, सक्षम आणि विकासाभिमुख असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले. सभेस मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

