मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नुकताच, मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर मुंबईत जाऊन हैदोस घातल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जरांगेंनी त्यांना नेपाळला नेऊन सोडण्याची भाषा केली होती. या वादात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उडी घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी भान राखून बोलणे गरजेचे असल्याचा सल्ला यावेळी दिला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोणाला नेपाळला नेऊन सोडायचे हे ठरवणारे मनोज जरांगे कोण? ओबीसी चळवळीत काम करणा-यांना परदेशात पाठवायचे असेल, तर एकट्या जरांगेंनाच महाराष्ट्रात राहायचे आहे काय? अशा प्रकारचे विधान करणे मनोज जरांगे यांनी टाळले पाहिजे. आपल्या हक्काचे मागायचा कोणालाही अधिकार आहे. आम्ही ओबीसी आहोत, तर आमच्या समाजबांधवांचे संरक्षण आणि त्यांच्या न्यायिक व घटनात्मक अधिकारांसाठी लढणे आमचा हक्क आहे. यासंदर्भात भुजबळांसह जरांगेंनीही वैयक्तिक टीका करणे टाळले पाहिजे. असा सल्ला दिला आहे.
लातूरमध्ये भरत कराड या तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यावर ते म्हणाले की, लातूरचा भरत कराड हा ओबीसी चळवळीत काम करणारा एक गरीब आणि सक्रिय कार्यकर्ता होता. सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवली. मी सोमवारी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी सरकारकडे भरत कराडच्या कुटुंबीयांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणा-या लोकांसारखीच भरीव मदत करण्याची मागणी केली.
















