जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो इतर भागाच्या तुलनेत जळकोटमध्ये तापमान अधिक असते. यावर्षीही उन्हाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे . जळकोट तालुक्यात अचानक उन्हाची तीव्रता वाढली आहे. जळकोटमध्ये उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला होता.
जळकोट तालुक्यात होळीपासून उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे . तापमानामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. अगदी फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान हे २५ अंश ते ३० अंशा दरम्यान होते परंतु आता मात्र तापमानात वाढ झाली आहे यामुळे नागरिक उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी डोक्यावर रुमाल अथवा टोपीचा वापर करीत आहेत . अचानक उन वाढल्यामुळे दुपारच्या सुमारास रोडवर गर्दी कमी झाल्याचे दिसून आले . उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जळकोट शहरातील रसवंती गृह, तसेच थंड पेयाच्या दुकानात नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे .
येणा-या काळात आणखीन तापमानात वाढ झाल्यास याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. जळकोट तालुक्यात यावर्षी अधिक पाऊस झाला होता त्यामुळे साठवण तलाव तसेच विहिरी व कुपनलिकेस पाणी आहे. त्यामुळे शेतक-यांनी शेतीमध्ये रब्बीची पिके घेतली आहेत तर आता उन्हाळी पिकांची पेरणी केलेली आहे. शिवारामध्ये पाणी असल्यामुळे शिवार सध्या थंड दिसून येत आहे परंतु ज्या भागात पाणी नाही किंवा डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी मात्र उन्हाची तीव्रता खूपच जाणू लागली आहे .

