जळकोट : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिना सुरू होताच जळकोट तालुक्यात पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. दिवसभर कडक ऊन आणि वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात पावसातील प्रदीर्घ खंडामुळे शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीनसह विविध पिके पावसाअभावी अडचणीत आली असतानाच आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमान वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. शेतातील उरली-सुरली पिकेही वाळत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतक-यांसमोर दुहेरी संकट
एकीकडे पावसाने दगा दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे आता वाढत्या तापमानामुळे शेतातील उरलेली पिकेही संकटात सापडली आहेत. सोयाबीन यापूर्वीच हातातून निघून गेले आहे, तूर या पिकावर शेतक-यांची भिस्त होती. परंतु प्रचंड ऊनाने पाऊस नसल्यामुळे तुरीचा चक्क खराटा झालेला आहे. यासोबतच कापूस या पिकाला देखील फटका बसत आहे. अतिरिक्त तापमानामुळे कापसाची बोंडे गळून जात आहेत. ऊसाला देखील या तापमानाचा फटका बसत आहे. आणि इतर पिकांवर उष्णतेचा परिणाम जाणवत असून जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा, वाढते तापमान आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान अशा दुहेरी संकटात जळकोट तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. आगामी काळात तापमान आणि पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पावसाची उघडीप आणि वाढते तापमान
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये वातावरणात हळूहळू गारवा निर्माण होण्याची अपेक्षा असते. मात्र यंदा पावसाचा खंड, जमिनीतील कमी झालेला ओलावा आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे ग्रामीण भागातील वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. शेतक-यांसाठी हा काळ विशेष चिंतेचा ठरत आहे.
















