25.9 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeलातूरजळकोट-उदगीर महामार्ग ६ वर्षांपासून अपूर्णच

जळकोट-उदगीर महामार्ग ६ वर्षांपासून अपूर्णच

जळकोट प्रतिनिधी
नांदेड-जळकोट-बिदर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० मंजूर करण्यात आला होता आणि जवळपास याचे काम दोन वर्षांपूर्वीच ९० टक्के पूर्ण झाले आहे मात्र दहा टक्के काम अद्यापही बाकी आहे. जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ गत सहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णच आहे तर कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरचा पूल अद्यापही झाला नाही . यामुळे या ठिकाणची वाहतूकही बंदच आहे यामुळे या महामार्गाचा काय फायदा असा सवालही जनता विचारत आहे .

या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री तथा रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वीच झाले आहे. असे असले तरीही या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रचंड धुळीचा त्रास गावक-यांना सहन करावा लागत आहे. अनेकांना अनेक दुर्धर आजार झालेले आहेत . तसेच या ठिकाणच्या पुलाचे काम तसेच रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे या पावसाळ्यात दहा दिवस या ठिकाणचा मार्ग बंद झाला होता . या ठिकाणाहून प्रवास करताना प्रचंड अडचणीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. यासोबतच नांदेड ते जळकोट दरम्यान असलेल्या कंधार तालुक्यातील मन्याड नदीवर असलेला पूल अद्यापही झालेला नाही. मानसपुरी गावाजवळचे काम अपूर्णच आहे. मन्याड नदीवर पूल झाला नसल्यामुळे या ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. नांदेड ला जाण्यासाठी बहादरपुरा मार्गे जवळ असताना नागरिकांना घोडज मार्गे जावे लागत आहे. एक ते दीड महिन्यापासून या ठिकाणाहून वाहतूक बंद आहे.

या ठिकाणाहून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था प्रवासी तसेच नागरिकांची झाली आहे . केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे विशेष लक्ष घालून सहा वर्षापासून अपूर्ण असलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांना सूचना द्याव्यात तसेच सामान्य नागरिक तसेच प्रवासी व वाहनधारकांची होणारे अडचण दूर करावी अशी मागणी प्रवासी तसेच सामान्य नागरिक व वाहनधारकांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR