जळकोट : प्रतिनिधी
जळकोट ते उदगीर या राष्ट्रीय महामार्गाचे शुक्ल कष्ट काही संपताना दिसून येत नाही. जळकोट ते उदगीर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान असलेल्या तिरूका गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून सध्या कार्यरत असलेल्या पुलाची तर खूपच दुर्दशा झाली आहे या पुलाच्या पुढे उदगीरकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर गुडघ्या एवढा खड्डा पडलेला आहे. या खड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून या खड्याला चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. असे असताना देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड येथील अधिका-यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
नांदेड ते उदगीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन जवळपास सहा वर्ष झाले असले तरीही या सहा वर्षांमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाला तिरुका गावाजवळील रस्ता पूर्ण करता आला नाही. यामुळे वाहनधारकांचे प्रचंड असे हाल होत आहेत. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे परंतु अतिशय कासव गतीने काम सुरू आहे. यामुळे वाहनधारकांना जुन्याच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी याच गावाजवळ चिखल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन फसून बसले होते. यामुळे दोन वेळेला तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती. विशेष म्हणजे गणरायांच्या आगमनादिवशी चार ते पाच तास वाहतूक ठप्प होती. आता या ठिकाणचा रस्ता दगड गोटे टाकून बरा करण्यात आला आहे मात्र या रस्त्याच्या पुढे तिरुका गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता हेच कळायला मार्ग नाही. या राष्ट्रीय महामार्गावर केवळ मोटार सायकल जाईल एवढाच रस्ता चांगला राहिलेला आहे. वीस बाय वीस रुंद व दोन ते तीन फूट खोल असा खड्डा पडलेला आहे या खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे आणि वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही यामुळे अनेकदा छोटे वाहन खाली घासले जात आहे.
या पडलेल्या मोठ्या खड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने भर भरण्याची गरज होती मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तात्काळ हा खड्डा बुजवावा व उड्डाण पुलावरील जे दगड गोटे उघडे पडले आहेत ती देखील दूर करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील तिरुकेरकर, राजू सगर, मदनकुमार मदेवाड, राजू पांडे, श्रीकृष्ण पाटील, सूर्याजी मुंडकर, दत्ता पाटील, रमाकांत मदेवाड, विनोद मदेवाड यांच्यासह प्रवाशांनी तसेच वाहन चालकांनी केली आहे.
















