जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका ऊन २५ वर्षे झाली तरीही या ठिकाणी बस डेपो मंजूर झाला नाही. अनेक वेळा बस डेपोचा प्रस्ताव मुंबई येथील प्रमुख कार्याकडे पाठविण्यात आला परंतु अद्यापही यास मंजुरी मिळाली नाही. बस डेपोसाठी तारीख पे तारीख दिली जात आहे . तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीने तालुकाध्यक्ष संग्राम कदम यांनी कार्यकर्त्यांसह अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जळकोट येथे स्वतंत्र बस आगार मंजूर करावे ही खुप जुनी मागणी आहे. जळकोट तालुका हा लातूर व नांदेड जिल्ह्याच्या सिमेवरचा तालुका आहे. हा तालुका वाढीव तांड्याचा व डोंगरी म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा विकास साधायचा असल्यास दळण वळणाची साधने असणे आवश्यक आहे. त्यासाठी जळकोट येथे बस आगार होणे अत्यंत गरजेचे आहे. जळकोट येथे नवीन बसस्थानकाची ४.५० कोटीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता फक्त बस आगार मंजूरीची प्रतीक्षा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , यांच्याकडे दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी बस आगार मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. तसा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकाने लातूर विभागीय कार्यालयाकडून मागवून घेतला आहे परंतु त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे .
या मागणीच्या अनुषंगाने दि १४ मे २०२६ पासून लोकशाही मार्गाने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा जळकोट तालुका विकास परिषदेच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्याचे प्रताप सरनाईक यांना दिला आहे. अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बस आगार मंजूर होईपर्यंत २५ बस द्याव्यात अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय बनसोडे, विभागीय नियंत्रक लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आता जळकोट तालुका विकास परिषदेने अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन सुरूच राहील अशी माहिती संग्राम कदम यांनी यावेळी दिली. या उपोषणामध्ये जळकोट तालुका विकास परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे . यासोबतच जळकोटमधील विविध पत्रकारांनीही या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
















