जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये सुरुवातीला पावसाने उघडीत दिली होती मात्र यानंतर तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, यामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा निर्माण झाल्यामुळे पिकांची उगवणही चांगली झाली आहे. तालुक्यात योग्य पाऊस झाल्यामुळे तालुक्यामध्ये पिकांची वाढ चांगली झाली असून तालुक्यामध्ये शेती शिवारात पिके बहरली आहेत .
जळकोट तालुक्यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला असून त्या खालोखाल कापूस तसेच मूग उडीद व इतर कडधान्य पिकांची लागवड शेतक-यांंनी केलेली आहे.जळकोट तालुक्यामध्ये जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला यामुळे पिकांची वाढही चांगली झाली आहे. जुलै महिन्यामध्ये तालुक्यामध्ये सलग पंधरा दिवस पाऊस पडल्यामुळे शेती शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला होता यामुळे अंतर मशागतीची कामे खोळंबली होती परंतु आता तीन ते चार दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे आता शेतकरी अंतर्मशागतीच्या कामात गुंतला आहे. कापसाला पाळी घालणे, खत देणे तसेच सोयाबीनमधील तण काढणे , कापूस तसेच सोयाबीनला फवारणी करणे आदी कामे शेतक-यांकडून केली जात आहेत .
पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला होता यानंतर शेतक-यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी सुरू केली आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची वाढ झाली आहे . तर कापूस पीकही चांगले आहे यामुळे यावर्षी तरी चांगले उत्पादन व्हावे अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. येणा-या काळात असाच पाऊस पडला तर सलग तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणा-या शेतक-यांंना थोडा बहुत दिलासा मिळणार आहे.