जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी दि.९ जून रोजी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेत शिवारात विविध ठिकाणी संखल भागात पाणी थांबले होते . जळकोट तालुक्यात सलग दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. दि ९ जून रोजी सकाळी अचानक आभाळ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल तासभर हा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते.
जळकोट तालुक्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे आता पेरणीपूर्व मशागतीची कामेही खोळंबली आहेत. ज्या शेतक-यांनी अद्याप पेरणी पूर्व मशागतीची कामे केली नाहीत अशा शेतक-यांना मात्र या पावसामुळे शेतामध्ये नांगरटी तसेच वखरणी आदी कामे करणे अवघड जात आहे. तालुक्यात सतत होत असलेल्या पावसामुळे शेतक-यांनी खते व बियाणे घरी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली आहे . ५० ते ६० टक्के शेतक-यांनी खते तसेच बियाणे खरेदी केली आहेत. कृषी विभागाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जूनपर्यंत पेरणी करू नये असे आवाहन केले आहे . पेरणीसाठी आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. जळकोट तालुक्यात असेच तीन-चार पाऊस पडल्यास शेतकरी आपली मूठ चाढ््यावर धरणार असल्याची शक्यता आहे.
















