जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात यावर्षी शेतक-यांंनी मूग या पिकाची जवळपास १००० हेक्टरच्या वर क्षेत्रावर पेरणी केली आहे. सुरुवातीला पावसाने उघडीप दिल्यामुळे मुगाची वाढ योग्य प्रकारे झाली नव्हती मात्र यानंतर सततच्या रिमझिम पावसामुळे मुगाची वाढ चांगल्या प्रकारे झाली असून सध्या श्रावण महिन्यामध्ये अनेक शेतक-यांच्या शेतीमध्ये मुगाला शेंगा मोठ्या प्रमाणात लगडल्या असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी मूग हा एन फुलो-यात असताना पावसाने मोठ्या प्रमाणात उघडीप दिली होती यामुळे मुगाचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. शेतक-यांना घरी खायलाही मुग झाले नव्हते. यामुळे शेतक-यांना विकत मूग घेऊन वर्ष काढावा लागले मात्र यावर्षी मुगाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पाऊस झाल्यामुळे यंदा मुगाची वाढ चांगली झाली आहे. मुगाच्या झाडाला फुलेही चांगली लागली व आता शेंगाही मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत.
शेंगा काढण्याच्या दरम्यान पावसाने साथ दिली तर चांगले उत्पादन शेतक-यांंना होणार आहे मात्र शेंगा वाळू लागतात पाऊस जर सुरू झाला तर पुन्हा एकदा मुगाचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात मुगाला शेंगा लगडतात. यावर्षीही शेतक-यांंच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुगाला शेंगा लागलेल्या दिसून येत आहेत.